Sharad pawar | कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, सीरमची शरद पवारांना माहिती
कोरोनावर लस कधी येणार हा सवाल सध्या सर्वांच्याच मनात आहे. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती सीरमनं शरद पवारांना दिली आहे. काल त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतले. मात्र हे कोरोनाचे औषधं नाही. सीरमची लस तयार व्हायला जानेवारीचा शेवट येईल असं मला त्यांनी सांगितलंय, असं शरद पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटला दिलेली ही दुसरी भेट आहे. 1 ऑगस्टला देखील शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन कोरोनावरील लस बनवण्याच काम कसं सुरुय याची माहिती घेतली होती. मात्र शरद पवारांच्या या भेटींमुळे त्यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.