Pune Porsche Accident Case : लेकाला वाचवण्यासाठी आईचा कट, ब्लड रिपोर्टसाठी स्वतः दिलं रक्त
Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कारने कल्याणीनगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिरडून मारल्यानंतर या प्रकरणात आता धक्कादायक उलघडा झाला आहे. अल्पवयीन पोराचे ससून रुग्णालयामधील घेण्यात आलेलं रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेलं सॅम्पल कोणाचे अशी चर्चा रंगली होती. आता हे रक्त त्या अल्पवयीन पोराच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शिवानीला अटक केल्यानंतर तिने चौकशीत कबुली दिली आहे. माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही कबुली आई-वडिलांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक उलगडा झाला आहे.
पुणे पोलिसांकडून शिवानी अग्रवालला अटक
मुलाची आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवालने या दोघांनी मिळून हा कट रचला होता. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचे समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर ससूनच्या सीसीटीव्हीमध्ये विशाल अग्रवाल दिसून आला होता. दरम्यान, पोर्शे कार अपघातात आतापर्यंत अल्पवयीन पोराचा बाप विशाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल तसेच आई देखील गजाआड झाली आहे. काल पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केली होती. ससूनच्या डॉक्टरांनी सॅम्पल कचऱ्यात फेकल्याचे समोर आल्यानंतर बदललेले अल्पवयीन पोराच्या आईचे होते, असा संशय पोलिसांना होता.
रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे
त्यामुळे पोराला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे आदी प्रतापही केले होते. शिवानीने ससूनमध्ये ब्लड सँम्पल दिले होते. डॉ. श्रीहरी हळनोरने हे सॅम्पल बदलले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले होते. हळनोरच्या दाव्यानुसार त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरने दबाव आणला होता. यानंतर केलेल्या चुकीची जाणीव होताच त्याने ससूनच्या वरिष्ठांना माफीनामाही लिहून दिला होता. तसेच या प्रकरणात अडकत असल्याचे पाहून त्याने आत्महत्येचा विचारही केला होता. यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.