Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
NCP Candidate Pune Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय घडमोडी घडताना दिसला. महायुतीमध्ये 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुण्याची जागा सुटली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) तर पुण्यातून विक्रम काकडेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र याच पुण्यातील जागेवरुन राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. संजय काकडे यांनी त्यांचे पुत्र विक्रम काकडेंसह (Vikram Kakade) आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर थेट विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
सुनील टिंगरे देखील होते इच्छुक- (Sunil Tingre Pune Vidhan Parishad Election 2026)
दिवंगत अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सुनील टिंगरे ओळखले जातात. राष्ट्रवादीच्या फुटीवेळी सुनील टिंगरेंनी अजितदादांना साथ दिली होती. त्यामुळे पुण्यातून सुनील टिंगरेंना उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची मागणी होती. विक्रम काकडे यांनी पक्षासाठी काय केलं?, असा सवालही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. पुणे विधान परिषदेवरुन सुनेत्रा पवारांच्या जिजाई बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत सुनील टिंगरेंसह राष्ट्रवादीचे अन्य चार-पाच आमदार देखील होते.