पुणे बंगळुरु महामार्गाच्या लगत गव्याचं दर्शन, सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु
पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं आहे. बावधन परिसरात हा गवा आढळला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारची हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी अर्थात HEMRL नावाची संस्था आहे. हा गवा सध्या या संस्थेची कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे आहे. HEMRL संस्थेच्या पलिकडे टेकडी आणि दाट झाडी आहे. या गव्याला पकडण्याऐवजी त्याला पुन्हा दाट झाडीमध्ये घालवून देण्याचा वनविभागाचा विचार सुरु आहे.
काही वेळापूर्वी कम्पाऊंड वॉलच्या शेजारी, अगदी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना दिसणारा गवा आजूबाजूला हालचाल वाढल्याने दाट झाडीमध्ये गेला आहे. पण सध्या जिथे हा गवा आहे ती अतिशय चिंचोळी जागा आहे. महामार्ग आणि कंपाऊंड वॉल यांच्यामध्ये असलेल्या जागेमध्येच त्याचा वावर आहे आणि त्याच्यावर याच ठिकाणी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.