NCP MLA Dilip Mohite Patil : PM Modi यांच्या राज्यात हिंमत दाखवणं कठीण जातंय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात हिंमत दाखवणं आम्हाला जड जातंय. असं जाहीरपणे कबुली देत, ब्रिटिशांच्या राजवटीची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केलीये. पुण्याच्या आळंदीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या जयंती उत्सवात मोहिते उपस्थित होते. तिथल्याच त्यांच्या मनोगतातील एक मिनिटं दहा सेकंदाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात मोहितेंनी ब्रिटिशांचा कठीण काळ बोलून दाखवला. तेंव्हा कोणती दाद अन फिर्याद ही नव्हती. कोणी काही करायला गेलं की लगेच शिक्षा व्हायची. याच इतिहासाची आता पुनरावृत्ती होते का? अशी भीती मोहितेंनी व्यक्त केली. भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोललं तरी ईडी-सीडी अशी कोणतीच भानगड मागे लागत नाही. पण मोदींच्या राज्यात आम्ही काही बोलायचं म्हटलं की लगेच फोन येतो, तुमच्या दोन फाईल पाठविल्या आहेत. त्यामुळे आत्ताचा कार्यकर्ता भीतीच्या सावटाखाली जगतोय. लोकशाही कोणी वाचवायची असा प्रश्न मला पडलाय, अन आता परत लोकशाहीर अण्णा भाऊ जन्माला येतील याबाबत ही मला शंका आहे. असं मत मोहितेंनी व्यक्त केलं.