Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट आदी उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या सकाळी सासवडकडे प्रस्थान होणार आहे.
पालखी दर्शनानंतर उपमुख्यमंत्री म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे पूजन केले. हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. हा आनंद अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. जोपर्यंत वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत् धर्माची पताका अशीच फडकत राहील. जोपर्यंत सूर्य-चंद्र असेल तोपर्यंत वारीची परंपरा अखंडित राहील.
पादुका दर्शनानंतर निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानच्यावतीने फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
काल संगमवाडी येथे विसावा घेतल्यानंतर पालखी भवानीपेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे मुक्कामासाठी दाखल झाली. आज पालखीचे भक्तिभावे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. उद्या सकाळी पालखी पुढील मुक्कामासाठी कदम वाकवस्तीकडे (ता. हवेली) प्रयाण करेल.