Uddhav Thackeray to visit Serum Institute Today | मुख्यमंत्री ठाकरे आज सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 जानेवारी) दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही आग लागल्याचं स्पष्ट झालं. मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूटचा हा नवीन प्लांट आहे. "मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरु होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत," असं राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपेंनी सांगितलं की, "कोरोना लस निर्मिती जिथे होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळे लसीचं कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरु आहे."