BJP MLA Ram Satpute | भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नात नियमांचं उल्लंघन, अनेक नेते विनामास्क

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा, नियम पाळा असं आवाहन पंतप्रधानांसह मुख्यमंत्री वांरवार करताना दिसतात. मात्र आमदारच या नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचं काल (20 डिसेंबर) पुण्यात थाटामाटात लग्न पार पडलं. मात्र या लग्न सोहळ्यात कोरोनाविषयक नियमांना तिलांजली देण्यात आली.
लग्न किंवा इतर सामाजिक सोहळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती नको आणि सोशल डिस्टन्ससह मास्क वापरणे बंधनकारक आहे. परंतु राम सातपुते यांच्या विवाह सोहळ्यात या सगळ्याच नियमांचा बॅण्ड वाजवण्यात आला. त्यांच्या लग्नात नेत्यांसह हजारो लोक उपस्थित होते. जे नेते राम सातपुते यांच्या लग्नाला उपस्थित होते त्यांनीही बेफिकीरी आणि हलगर्जीपणाचं दर्शन घडवलं. अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हताच पण त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचही पालन केलेलं नव्हतं. सातपुते यांच्या लग्नात अक्षरशः सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याने कोरोना हद्दपार झाला की काय अशी चर्चा ही रंगली होती.
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
आमदार सातपुते यांचा साखरपुडा झाल्यानंतर ही सातपुते विविध मुद्द्यांवरुन चांगलेच ट्रोल झाले होते. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यास राज्यातील मातब्बर नेत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर कारवाईला सामोरे जावं लागतं. त्यामुळे ज्या लग्न सोहळ्यात नियमच स्वाहा करण्यात आले त्यावर कारवाईच्या अक्षता पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola