Ajit Pawar vs Yugendra Pawar : पत्नीच्या पराभवानंतर दादांचा पहिला झटका युगेंद्र पवारांना
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरुन बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण कुस्तीगीर परिषदेकडून पुढे करण्यात आले आहे. यावर आता युगेंद्र पवार आणि शरद पवार गट (Sharad Pawar camp) काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आपल्याला या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून हटवण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप काही कळवण्यात आलेले नाही किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये काहीतरी निर्णय झाल्याची माहिती आहे.