Vedika Shinde :वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी,16 कोटींच्या इंजेक्शनंतरही वेदिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी मात्र ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.
फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.