Uddhav Thackeray Full PC : एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

Continues below advertisement

मुंबई: आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. ते बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरुद्ध थेट 'आर या पारची' भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 

लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

मी सगळं सहन करुन उभा राहिलोय, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन: उद्धव ठाकरे

आताही ज्या कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की, माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर या सगळ्यांना आव्हान देत आहे. मी म्हणजे मी नाही, तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे. पण आगामी दिवसांमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार करा. लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

कर्णही अशीच भाषा बोलायचा, उद्धव ठाकरे लोकशाहीच्या लढाईत कौरवांच्या बाजूने: सुधीर मुनगंटीवार

महाभारतात कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता, इथेही असंच काहीसं घडतंय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर्ण हा पांडवांचा भाऊ होता. इतिहासाची पुनरावृत्ती होते. बाळासाहेब ठाकरे कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नव्हते. काँग्रेससोबत ज्या दिवशी जावं लागेल, त्यादिवशी मी माझं दुकान बंद करेन, असे त्यांनी म्हटले होते. पण दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका दुर्योधनाच्या आणि कौरवाच्या बाजूने जाण्याची होती, ती भूमिका उद्धवजींनी या लोकशाहीच्या युद्धात घेतली आहे. कर्ण ज्याप्रकारे अर्जुनाला उद्देशून बोलायचा, एकतर तू राहशील किंवा मी राहीन, तीच भाषा, तोच भाव, तीच कथा, तोच प्रसंग हे आपण आता लोकशाहीच्या युद्धात पाहतोय. कोणीही कोणाला धडा शिकवण्याची भाषा कधी करु नये. रावणाने भाषा केली, कंसाने भाषा केली, जेव्हा जेव्हा अशी भाषा केली जाते, आपण शकुनीसारख्या लोकांच्या नादी लागतो, तेव्हा आपण किती शक्तिशाली असलो तरी अपयशच आपल्या वाट्याला येते, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram