Raj Uddhav Thackeray : ठाकरे बंधू सोबत, मविआशी फारकत? गणितं बिघडणार? Special Report
पाच जुलैला झालेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्धव ठाकरेंनी 'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी' असे स्पष्ट करत राज ठाकरेंसोबतच्या राजकीय युतीचे संकेत दिले. जवळपास वीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊ पाहणाऱ्या या ठाकरे बंधूंमुळे महाविकास आघाडीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी बनली होती, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तिची गरज नाही, असे म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, असा लोकांचा दबाव असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मात्र आघाडी टिकायला हवी, नाहीतर तोंडावर आपटण्याची वेळ येईल, असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंची साथ मिळाल्यावर उद्धव ठाकरे इतरांनाही दूर करू शकतात, असा अर्थ शिंदेंच्या नेत्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावरून काढला आहे. पाच जुलैच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावली, पण काँग्रेसने मात्र या मेळाव्यापासून दूर राहणे पसंत केले. मवियात राज ठाकरे आल्यास काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे, कारण हिंदीचा कडवा विरोध आणि कट्टर हिंदुत्वाचा नारा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रतिमेला धक्का देणारा ठरू शकतो. राज ठाकरे यांनी अद्याप उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर चकार शब्द उच्चारलेला नाही. उलट युतीसह कोणत्याच मुद्द्यावर आपल्या परवानगीशिवाय मनसेच्या नेत्यांनी बोलायचे नाही, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे राज ठाकरे दिलसे प्रतिसाद देणार का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात आला.