Sanjay Kaka Vs Rohit Patil| तासगावमध्ये रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा संजयकाकांचा आरोप

Continues below advertisement

सांगली : विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत. दुसरीकडे बड्या नेत्यांच्या सभांचं नियोजन होत असून त्यांचे दौरे ठरल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उमेदवारांकडून मतदारसंघातील गाव ते गाव आणि डोअर टू डोअर प्रचारालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, रोहित पाटील (Rohit patil) उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदाराना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटतानाचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघात मोठा गोंधळ उडाला असून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारीसाठी (Police) पाटील गटाचे समर्थक ठाण मांडून बसले आहेत.  

शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप संजयकाका पाटील गटाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट व दिवाळी फराळ असे वाटपाचे काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप असून मोठ्या संख्येने संजय काका गटाचे कार्यकर्ते येथे जमले आहेत. या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ देखील काढला आहे. तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे संजय काका पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अतिशय़ निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहित मिळाली आहे. उद्या-परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन, लाखो रुपयांचे आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचंही संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram