Rahul Gandhi यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'; Modi सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचं मंथन ABPMajha

Continues below advertisement

#Rahulgandhi #Delhi #Monsoonsession2021

नवी दिल्ली :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज 14 प्रमुख विरोधी पक्षांना आज सकाळी ब्रेकफास्ट साठी आमंत्रित केलं आहे. या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' च्या माध्यमातून राहुल गांधी आज 100 हून अधिक खासदारांशी चर्चा करणार असून त्यामध्ये केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारी सुरु आहे. राहुल गांधींच्या या 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' चे आयोजन संसदेतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलं असून त्यानंतर विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. 

शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस प्रकरणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन केंद्र सरकारने संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी देशातील 40 पत्रकार, विरोधी पक्ष नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा दावा फ्रान्सच्या एका माध्यमाने केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. 

गेल्या आठवड्यात संसदेच्या कामकाजातील 105 तासांपैकी केवळ 18 तासच कामकाज चालू राहिलं होतं. केंद्र सरकारने पेगॅसस प्रकरणी आपले हात झटकले असून तसा काही प्रकार झाला नसल्याचं सांगितलं आहे. परंतु विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. 

पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून ज्या लोकांवर पाळत ठेवण्यात आली होती त्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश असल्याचं समजतंय.

शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसदेत ट्रॅक्टरवरुन प्रवेश केला होता. आज त्यांनी याच मुद्द्यांवरुन 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' आखली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram