Pravin Gaikwad Black Ink Attack | प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, हत्येचा कट;गायकवाडांचा आरोप

Continues below advertisement
अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले. संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आणि स्वामी समर्थांचा अपमान केल्याचा आरोप करत हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दीपक काटेसह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर मोठी नाराजी व्यक्त केली जात असून याच्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. गायकवाड यांनी आपल्या हत्येचा कट होता ज्याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्यांचा संदर्भ देत, त्यांच्या विचारधारेला विरोध असल्याने हे हल्ले झाल्याचे म्हटले. संभाजी ब्रिगेडची विचारधारा राज्यघटनेला अभिप्रेत असल्याने आपल्याला संपवण्याचा संशय गायकवाड यांनी व्यक्त केला. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असून शिवधर्म फाऊंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे. चार वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यासाठी त्याने आमरण उपोषण केले होते. सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना काटेच्या बॅगेत पिस्तूल आणि अठ्ठावीस काडतूस सापडली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी गायकवाड यांची फोनवरून विचारपूस केली. सत्ताधारी राष्ट्रवादीतील आमदार अमोल मिटकरी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने हे सरकारचे अपयश किंवा सरकार पुरस्कृत हल्ला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ब्यूरो रिपोर्ट एबीपी माझा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola