Praful Patel on modi Cabinet : काही दिवस धीर ठेवणार, मोदी सरकारमध्ये योग्य निर्णय घेण्यात येईल- पटेल
Praful Patel on modi Cabinet : काही दिवस धीर ठेवणार, मोदी सरकारमध्ये योग्य निर्णय घेण्यात येईल, राष्ट्रवादीचा एकही खासदार शपथ घेणार नाही, भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रिपद मान्य नाही असं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिलं आहे. तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे.
भाजपप्रणित एनडीए आघाडीचं सरकार लवकरच स्थापन होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मोदींसह देशातील 46 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील 5 नावांवर शिक्कामोर्तब झालं असून शिवसेना शिंदे गटाच्या खासदारालाही संधी देण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या मंत्रिमंडळात स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आता ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्या माजी मंत्री प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, आम्हाला पुढील काही काळासाठी धीर ठेवण्याचं सांगण्यात आल्याचं पटेल यांनी म्हटलं.
भाजपाकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पू्र्वी भारत सरकारमध्ये मंत्री राहिलो आहे. त्यामुळे, स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात काही भाजपच्या श्रेष्ठींची काही चूक आहे किंवा नाही, असं नाही. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षाचे 7 खासदार निवडून आले आहेत. त्या पद्धतीने त्यांना ज्या सूचना मिळाल्या, त्याच पद्धतीने आम्हालाही सूचना मिळाल्या आहेत. तुम्ही थोडे दिवस धीर ठेवा, हेही आम्हाला सांगण्यात आलं आहे. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रात जो काही निर्णय त्यांनी घेतला आहे, तो शिवसेनेशी तुल्यबळ समजूनच आमच्याबाबत निर्णय घेतला असावा, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.