Sambhaji Patil | लातूर ग्रामीणच्या आमदारकीवरुन भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात 'फिक्सींग' झाली होती, असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. एकाच खुलाश्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या राजकीय व्यवहाराबद्दल पाटील-निलंगेकर यांनी खळबळजनक खुलासा एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
लातूर ग्रामीणची जागा अमित देशमुख यांना देवून देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा खुन केला. ही जागा भाजपकडे होती. ऐनवेळी ही जागा सेनेला सुटली. या जागेसाठी सेनेने दिलेला उमेदवार प्रचाराला फिरकला देखील नाही. हे राजकारणातले सेटींग आहे. अमित देखमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांनी ही जागा लढवली आणि विजयी झाले. मात्र, हा विजय कमालीचा एकतर्फी होता. फडणवीसांनी लातूर ग्रामीणची भाजपची विनिंग सीट शिवसेनेला सोडून धीरज देशमुख यांना आमदार केलं. ही राजकारणातली सर्वात मोठी फिक्सिंग असल्याचा गंभीर आरोप निलंगेकर यांनी केला आहे.
..त्यावेळी फडणवीस यांना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो : निलंगेकर
ज्या लोकांनी त्यावेळेस दावा केला की आम्ही घरी बसून विजयी झालो (देशमुख) त्यांनी लोकशाहीचा खुन केला. लातूर जिल्ह्यातील सातच्या सात जागा मी निवडून आणला असत्या. देवेंद्र यांच्या त्या गोष्ठींना विरोध करणारा मी एकमेव आमदार होतो, पुढेही मी हेच करणार असल्याचा निर्धार निलंगेकर यांनी व्यक्त केला. त्या जागेवर नोटाला सर्वात जास्त मतदान झाले असून मुंबईतल्या एका जागेसाठी हे फिक्सींग केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.