NDA Govt India : 9 तारखेला एनडीए सरकार स्थापन होणार! राष्ट्रपती भवनात शपथविधीची जय्यत तयारी
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत भाजपप्रणित NDA आघाडीचा खेळ यंदा 300 च्या आतच आटोपल्याने त्यांच्याकडे काठावरचे बहुमत आहे. मात्र, संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेलुगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी साथ दिल्याने एनडीए सरकार सत्तेत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दिल्लीत 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी (PM Modi) हे पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचवेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएच्या या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
एनडीए आघाडीत महाराष्ट्रातील अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्यालाही मंत्रीपदं येणार आहेत. चार खासदारांमागे एक मंत्री असे एनडीएच्या जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार शिंदे गटाने एका कॅबिनेट मंत्रिपदावर आणि एका राज्यमंत्रीपदावर दावा केला आहे. अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला असला तरी प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते. तसेच रामदास आठवले यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.एनडीए आघाडीकडून आजच सरकार स्थापनेचा दावा केल्या जाण्याची शक्यता आहे. ११ वाजता एनडीएच्या खासदारांची होणार बैठक होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल.