BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधी
राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती सरकारमध्ये या पाचपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अंतिम यादीत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे.
माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. 2014 साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येकवेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार, अशी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून वंचित राहतात. आतादेखील त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे भाजप आणि संघ परिवरातील जुन्या-जाणत्यांच्या वर्तुळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल.