Prashant Kishor on Politics : 2024 मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी उभी करणं पूर्णपणे शक्य
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज सोमवारी एक महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, 2024 मध्ये भाजपला (BJP) पराभूत करू शकणारी विरोधी आघाडी उभी करणं हे पूर्णपणे शक्य आहे. इतकचं नव्हे तर त्या आघाडीला मदत करायची आपली इच्छा असल्याचं देखील किशोर यांनी म्हटलंय. येत्या महिन्यात होत असलेल्या पाच राज्यांतील निवडणुका या एकप्रकारे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीची सेमी फायनलच असून त्यातील आकडे जरी प्रतिकूल आले तरीही ही आघाडी 2024 ला विजयी होऊ शकते, असं विधान त्यांनी केलंय.
प्रशांत किशोर म्हणाले की, 2024 मध्ये भाजपला पराभूत करणे पूर्णपणे शक्य आहे. पण सध्याच्या विरोधकांसह भाजपला पराभूत करणे शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असंच आहे. मात्र, 2024 मध्ये एक भाजपला मजबूत लढा देऊ शकेल अशी विरोधी आघाडी तयार करण्यात मला मदत करायची आहे, असं प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्ही या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय. ते म्हणाले की, भाजपने हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोककल्याणाची मांडणी एकत्र करून एक अतिशय "महाभयंकर कथा" रचलेली आहे. या तीनपैकी किमान दोन मुद्यांवर तरी विरोधी पक्षांना त्यांना मागे टाकावे लागेल.
प्रशांत किशोर यांनी यावेळी भारतातील 543 पैकी सुमारे 200 लोकसभेच्या जागांचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले की, या जागांमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मोठ्या प्रमाणावर द्विपक्षीय लढत दिसते आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने यापैकी 95 टक्के जागा जिंकले होते.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर त्याच्यासमोर 5-10 वर्षांचा मोठा दृष्टीकोन असायला हवा. हा पराभव अवघ्या पाच महिन्यांत होऊ शकत नाही."