राष्ट्रवादीमध्ये अजितदादांमुळे मोठं रामायण घडलंय. आता त्याच्या महाभारताची सुरूवात आज होणार आहे. कारण, एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी ११ वाजता बैठक बोलवलीय. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी १ वाजता आयोजित केलीय. तसे व्हिपही बजावण्यात आलेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडलेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केलाय. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवलीय. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.