WEB Originals | एक दोन नाही तर तब्बल तीस SET परीक्षा क्रॅक करणारा अक्कलकोटचा शिक्षक | ABP Majha
महाराष्ट्रातील सर्वात सुपर टॅलेंट.. देशातल्या सर्व राज्यांच्या 30 SET परीक्षा उत्तीर्ण होणारा भारतातील एकमेव शिक्षक. नाव धानय्या गुरुलिंगय्या कवटगीमठ. गाव तोळणूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर.. फक्त सेटच नाही तर वेगवेगळ्या पॅटर्नच्या तीन नेट परीक्षाही या अवलियाने क्रॅक केल्या आहेत. ज्या राज्यात आज तारखेला सेट परीक्षा होतच नाही, त्याच राज्यांची सेट परीक्षा कवटगीमठ सरांनी दिलेली नाही. त्यांचा हा विक्रम देशा विदेशातल्या नऊ रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवला गेलाय. त्यांनी सेट परीक्षा कशी करायची यावर अनेक पुस्तकेही लिहिलीत. त्यातील एक व्याख्यान अलीकडेच दिल्लीतल्या जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातही झालं. या भाषणानंतर यूजीसीने त्यांचा सत्कारही केला.
अशा या कवटगीमठ सरांचे आई वडिल निरक्षर, एवढंच नाही तर त्यांना स्वतःला दहावी-बारावीला इंग्रजीला जेमतेम काठावर पास होण्यापुरते मार्क्स. तरीही न डगमगता कवटगीमठ सरांनी इंग्रजीतूनच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्रजीमध्ये प्राविण्य मिळवलं.
सेट नेट परीक्षा क्रॅक करण्याचे क्रॅश कोर्सही कवटगीमठ सर घेतात. त्यांच्या शिकवणी वर्गातील तब्बल तेवीस विद्यार्थ्यांनी SET परीक्षा क्रॅक केलीय.
ABP माझाच्या Web Originals या नव्या उपक्रमात सर्वात पहिला वेबीसोड अक्कलकोटच्या धानय्या कवटगीमठ सरांच्या आगळ्या-वेगळ्या कर्तृत्वावर..