Nashik | स्पेशल रिपोर्ट | नायलॉन मांजा अजून किती जणांचे जीव घेणार? नाशिकमधील घटनेनंतर संतप्त सवाल
नायलॉन मांजामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली असून नायलॉन मांजावरील बंदी ही फक्त कागदावरच मर्यादित असल्याचं यातून समोर आलय. हा नायलॉन मांजा अजून किती जणांचे जीव घेणार? या महिलेच्या मृत्यूला जबाबदार नायलॉन मांजा की प्रशासनाचा हलगर्जीपणा? असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय.
नाशिकच्या जाधव कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. 5 वर्षाच्या प्रथमेशची आई त्याला सोडून गेलीय तर आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेल्या एका वयस्कर आईचा आधार हरपलाय आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत ठरलाय तो म्हणजे नायलॉन मांजा. शहरातील अमृतधाम परिसरात भारती जाधव या महिला आपल्या आई आणि मुलासह वास्तव्यास होत्या, अंबड परिसरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आपल्या कुटुंबाचा त्या उदरनिर्वाह करायच्या. सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी त्या कामावर तर गेल्या मात्र त्यानंतर जे काही घडलं ते भयानक होत. संध्याकाळी काम आवरून त्या दुचाकीवरून घरी परतत असतानाच द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस समोर पुलावर अचानक नायलॉन मांजामुळे त्याचा गळा कापला गेला आणि त्या खाली कोसळल्या.