Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Raj Thackeray on Nashik Tree cutting: नाशिकमध्ये (Nashik) 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Kumbh Mela 2027) मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील वृक्षतोडीला (Nashik Tree cutting) कडाडून विरोध केलाय. आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील मैदानात उतरले असून, साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करुन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे म्हणत राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार हल्लाबोल केलाय.
राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.