Nashik Lockdown : नाशिकमध्ये कडक लॉकाडाऊनमुळे रुग्णसंख्या घटली, आता मृत्यूदर रोखण्याचं आव्हान
कडक लॉकडाऊनची मात्रा नाशिककरांवर काही प्रमाणात लागू पडली आहे. रुग्णवाढीचा आलेख झपाट्याने खाली आला आहे, मागील महिन्यात देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या वाढीच्या जिल्ह्यात नाशिकचा समावेश होता. 48 हजार पर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पोहचली होती, तीच संख्या आता 16 हजार 221 पर्यंत आली आहे. पॉझिटिव्हीटी रेट देखील 35-40 टक्यावरून 7 ते 8 टक्यावर आलाय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण संख्या कमी होती त्यातच 12 मे 23 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू केल्यानं बाजारपेठेत होणारी गर्दी थांबली, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील प्रसार काही प्रमाणात कमी झाला, अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त जे नागरीक घराबाहेर पडत होते त्यांना पोलिसांकडून चोप दिला जात होता या सर्वांचा एकत्रित सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी दर दिवशी 30 ते 40 मृत्यू आजही होत असल्याने मृत्यू दर कमी करण्याचे आव्हान कायम आहे.