Nashik Ragging case : मंत्री अमित देशमुखांकडून डॉक्टर शिंदेच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश
नाशिकच्या डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये काल एका एम डी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉक्टर स्वप्निल शिंदे असे मृताचे नाव आहे.
दरम्यान या प्रकरणात दोन सीनियर मुलींकडून रॅगिंग केली जात होती आणि या त्रासाला कंटाळून मुलाचा घातपात झाल्याचा आरोप स्वप्निलच्या कुटुंबियांनी केला आहे. छळ होत असल्याबाबत कॉलेज प्रशासनाला याआधी देखील कल्पना दिली होती, मात्र दुर्लक्ष केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर मुलींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद, पुढील तपास सुरु आहे.
दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले, स्वप्निल नेहमी डिप्रेशनमध्ये असायचा त्याची ट्रीटमेंट देखील सुरु होती अस प्रशासनाचं म्हणणं आहे. रॅगिंग वगैरे प्रकार नाही, असं डीन मृणाल पाटील यांनी सांगितलं आहे.
मृणाल पाटील यांनी सांगितलं की, जे काही झाले ते वाईट झाले. तो आमच्याकडे एम डी च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सप्टेंबर 2020 मध्ये त्याला डिप्रेशनचा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं होतं. औरंगाबादलाही त्याच्यावर मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरु होती. त्याचे कुटुंबीय त्याला फेब्रुवारी महिन्यात घरी घेऊन गेले होते. जुलैमध्ये तो आला आणि त्याची अशी परिस्थिती बघता परवानगी नसतानाही त्याच्या आईला आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये त्याच्या सोबत राहण्यास जागा दिली, असं पाटील यांनी सांगितलं.
त्यांनी म्हटलं की, त्याच्या कामाची वेळही कमी करण्यात आली होती, 9 ते 5 तो काम करायचा. जुलैपासून त्याच्या आईने पण माझ्याकडे काही तक्रार केली नाही. काल ओटीच्या वॉशरूममध्ये तो गेला असता तिथे तो पडला. दार तोडून त्याला बाहेर काढण्यात आलं. आम्ही पोलिसांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृत्यूचे कारण पोस्ट मॉर्टम रिपोर्टनंतर कळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. रॅगिंगबाबत ऑफिशियल त्याने किंवा कुटुंबाकडून आम्हाला कधीच माहिती देण्यात आली नाही. तक्रारही नाही. मुलींनी त्रास दिल्याचा जो आरोप केला जातोय, त्यानुसार आम्हीही चौकशी सुरु केली आहे, असं पाटील यांनी सांगितलं.