Nashik EVM Machine Issue : मतदना पूर्ण, पण मशीनच बंद होईना, नाशकात EVMचा गोंधळ
Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आला होता. आज नाशिक लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी देखील नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्याने या मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje), अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्या प्रमुख लढत होत आहे. सकाळी सात वाजेपासून नाशिककरांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये 51.16 टक्के इतके मतदान झाले. त्यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात 51.01 टक्के, देवळाली मतदारसंघात 48.80 टक्के, नाशिक पश्चिममध्ये 45.08 टक्के, नाशिक पूर्वमध्ये 49.23 टक्के इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये 57.11 टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये 58.70 टक्के मतदान झाले.
शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल
आजच्या मतदानाची दिवशी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यभरात गाजला. शिवसेनाच्या दोन्ही गटात लढत असताना शांतिगिरी महाराज यांच्या अपक्ष उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली. हेमंत गोडसे यांनी देव दर्शन करत मतदानाचा हक्क बजावला. राजाभाऊ वाजे यांचेही कुटूंबियांनी औक्षणं केले तर शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरला अभिषेक करत मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर मतदान कक्षाला गळ्यातील हार घातल्याने शांतिगिरी महाराज वादात सापडले. केंद्र प्रमुखाला न जुमानता हार घातल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या 4 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. शांतीगिरी महाराज यांचे चिन्ह आणि नाव असलेल्या स्लिप वाटणे, अंगावर परिधान केलेल्या कुर्त्यावर जय बाबाजी नाव असल्याचा आक्षेप घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला.