पवारांवर निशाणा, भुजबळांवर ताशेरे; कौतिकराव ठाले पाटील यांच्या अक्षरयात्रा अंकातील लेखामुळे खळबळ
'शरद पवार यांना मोठं करण्यासाठी दिल्लीत संमेलनाचा घाट घातला होता,' असा आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 2020-21 या वर्षाच्या 'अक्षरयात्रा' या वार्षिक अंकातून अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकमध्ये नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याशिवाय संमेलनाच्या निधीवरुन ठाले पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतु यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
कौतिकराव ठाले पाटील यांच्या या सडेतोड लेखामुळे साहित्य क्षेत्र आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीला संमेलन व्हावे अशी मागणी करणारी पुण्याची सरहद्द संस्था, नाशिकच्या संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळ यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नाशिकच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर ठाले पाटील यांनी सडकून टीका केली आहे.