Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
नाशिक : राज्यभरातल्या पालकमंत्र्यांची यादी अद्याप जाहीर झाली नसताना नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीच्या मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला निमित्तही तसंच आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नाशिकच्या दौऱ्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या पत्रकावर कोकाटे यांचा नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या इतर मंत्र्यांना मात्र धडकी भरल्याचं दिसून येतंय.
नाशिकमध्ये पालकमंत्रिपदासाठी भाजप-राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा
नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे चार मंत्री आहेत. या चौघांमध्येही पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. यांच्यातील पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यात आमचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच असेल असं या आधी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.