कांद्यांची कोंडी फुटली! लिलाव सुरू, लासलगावमध्ये सरासरी 4 हजार 700 चा भाव
नाशिक : अखेर चार दिवसांनंतर कांदा कोंडी आज फुटली असून कांद्याचे लिलाव सुरू झाले. कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारने निर्बंध लावले होते. होलसेल व्यापारी 25 टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टन पेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अघोषित लिलाव बंद ठेवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत व्यापाऱ्यांना कांदा लिलाव सुरु करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्या पाठोपाठ केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देत कांद्याची खरेदी विक्री, प्रतवारी आणि पॅकेजिंग साठी 3 दिवसांची मुदत दिली आहे, त्यामुळे निर्बंध हटवले नसले तरी, कांदा लिलाव सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. आजपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरळीत सुरू झाले.
केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 4 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत मधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि कांदा व्यापारी यांच्यात बैठक होऊन त्यांना लिलाव सुरू करण्यास सांगितल्यावर आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाले. आज जास्तीस जास्त 5900 तर सरासरी 4700 रुपये भाव निघाला.
म्हणून कांदा लिलाव झाले होते ठप्प
मागील आठवड्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तर दुसरीकडे कांद्याचे लिलावच ठप्प झाले होते. कांद्याची साठेबाजी होऊ नये व्यापऱ्याकडील कांदा बजारत यावा कांद्याचा तुटवडा कमी होऊन शंभरीच्या उंबरठ्यावर गेलेले भाव कमी व्हावेत यासाठी केंद्र सरकारने कांदा साठेबाजीवर निर्बंध लावले. होलसेल व्यापाऱ्यांनी 25 टनापेक्षा जास्त तर किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टनापेक्षा जास्त कांद्याची साठेबाजी करू नये असा निर्णय सरकारने घेतला आणि जिल्ह्यातील कांदा लिलावाच ठप्प झाले. यात बळीराजा मात्र नाहक भरडला गेला.