Nagpur Rain | नागपूरमध्ये पूरसदृश स्थितीनंतर पावसाची विश्रांती मात्र कायमस्वरूपी तोडगा कधी?
नागपूरमध्ये काल झालेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आज नागपूरमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. नागपूरसोबतच भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूरच्या या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने वीएनआयटीच्या तज्ञ लोकांची समिती तयार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. पालिका आयुक्तांनी आपल्या झोनच्या अधिकाऱ्यांना आणि वॉर्ड ऑफिसरला पावसाळ्यापूर्वी नाली आणि स्टॉर्म ड्रेनची साफसफाई झाली आहे की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश द्यावेत, असेही ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेने एक विशेष पथक झोननिहाय तयार करून ज्या भागांमध्ये पाणी साचते, त्याचे कारण शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात. स्टॉर्म ड्रेन लहान असल्यास ते मोठे करावेत किंवा पाण्याचा मार्ग अडकला असल्यास तो नदीच्या मार्गात जोडावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.