नागपुरात माजी महापौर संदीप जोशी यांचं आंदोलन सुरु; क्रिस्टल रुग्णालयाविरोधात कारवाई न केल्यानं संताप
नागपूरच्या क्रिस्टल या खाजगी रुग्णालयात दिलीप कडेकर या कोरोना बाधित रुग्णाचा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन समोर आंदोलन झाले. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलीस स्टेशन समोर झालेल्या धरणे आंदोलनात कडेकर कुटुंबीय ही सहभागी झाले होते. रुग्णालय प्रशासन विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी केल्याच्या अनेक दिवसानंतर ही पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाहीत, असा आरोप या आंदोलनात करण्यात आला. लेखी तक्रार दिल्याच्या 18 दिवसांनंतरही पोलीस तपासाचे नावावर एक पाऊलही पुढे टाकत नसतील तर आमच्यासमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे संदीप जोशी म्हणाले. तर मृत दिलीप कडेकर यांच्या पत्नी कल्पना कडेकर यांनी न्यायाची मागणी केली. या वेळी पोलीस स्टेशन मध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालय सामान्यांच्या जीवावर उठले असताना पोलिसांनी सामान्य नागरिकांची साथ देत नाही असा मुद्दा समोर करत आंदोलकांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलं, अखेरीस पोलिसांनी माजी महापौर संदीप जोशी यांना ताब्यात घेतले.