Maharashtra Weekend Lockdown | कल्याण डोंबिवलीत कुठे लॉकडाऊनचं पालन; कुठे उल्लंघन?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्बंध आणखीच कठोर केले आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानही बंद राहणार आहेत. तसंच नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. कल्याण-डोंबिवली शहरात देखील लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. काल रात्रीपासूनच लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेसह महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यावर तूरळक रहदारी दिसून येत आहे. मात्र काही नागरिकांना मॉर्निंग वॉकचा मोह काही आवरता आलेला नाही. कल्याणचा काळा तलाव बंद करुनही या परिसरात नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी हजेरी लावली आहे. तलाव बंद असताना चक्क गेटवरुन उड्या मारत या ठिकाणी नागरिक जात होते. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती दिवसागणिक भयावह होत आहे. काल दिवसभरात 2000 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उपचारासाठी बेडची देखील कमतरता भासत आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासन, महापालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे, मात्र या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्यही तितकेच गरजेचं आहे.