BMC Ward : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेचा वाद? ठाकरे गटातील माजी नगरसेवकाची हायकोर्टात धाव
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून, पुन्हा जुनी प्रभागरचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर बुधवारी तातडीनं सुनावणी घेण्याचं मुंबई उच्च न्यायालयानं निश्चित केलं आहे. मुंबई महापालिकेसह विविध महापालिकांची प्रभागरचना नव्यानं करण्याचा निर्णय मविआ सरकारनं घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांत नऊनं वाढ होऊन ती २३६ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण शिंदे-फडणवीस सरकारनं तो निर्णय रद्द करून पालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करून तसा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशाला शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.