Mumbai Drugs Case : मुंबईत ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर, ABP माझाकडून तस्करीचा पर्दाफाश

Continues below advertisement

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईनंतर आता मुंबईमध्ये लहान मुलांकडून ड्रग्जची तस्करी करून घेतली जात आहे. सर्वात अगोदर लहान मुलांना ड्रग्जच्या आहारी ढकललं जातं आणि नंतर त्यांच्याकडून ड्रग्जची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी वापरण्यात येणारी ही नवीन पद्धत आहे. फक्त इतकंच नाही तर "कोडीन" नावाच्या ड्रग्जचा सप्लाय मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये होत आहे.


एखाद्या देशाचं भविष्य कोण? जर असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल "लहान मुलं" पण याच मुलांना हातात खेळण्याऐवजी ड्रग्ज दिले तर काय होईल ? आपण विचार ही करू शकत नाही अशी परिस्थिती ओढावेल. परंतु मुंबईमध्ये लहान मुलांचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी करण्यात येत आहे. फक्त लहान मुलचं नाही तर दिव्यांग आणि टीबीच्या रुग्णांकडून सुद्धा ड्रग्जची तस्करी करून घेतली जात आहे. तर "कोडीन" नावाचे ड्रग्ज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सप्लाय होत आहे आणि या लहान मुलांकडून हा सप्लाय केला जात आहे.


मुंबईच्या झोपडपट्टी असलेल्या भागात राहणाऱ्या लहान मुलांकडून हे काम करून घेतलं जातं आहे. सर्वात जास्त धारावी, कुर्ला, वडाळा,अँटॉपहिल सारख्या परिसरात मोठया प्रमाणात ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर पाहायला मिळाला आहे. बबलू पट्री ज्याला एनसीबीने कुर्ल्यातून अटक केली तो लहान मुलांकडून ड्रग्ज तस्करी करून घेत होता. बबलु पट्री या आधी सुद्धा गंभीर गुन्ह्यात अटक झाला होता. आणि काही गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध पोलीस घेत होते. तर सिराज अहमद आणि मोहम्मद सत्ता यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून जवळपास 40 किलो "कोडीन" जप्त केली आहे.


पुस्तकांऐवजी या लहान मुलांच्या हातात ड्रग्जचे पॅकेट दिले जात आहे. या आधी यांना ड्रग्जच्या आहारी लावून आणि 200 ते 300 रुपये देऊन त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जात आहे. तर एका मुलाला तर ड्रग्जच्या या जाळ्यात 4 वर्षांपासून अडकवून ठेवलं गेलं होतं.


काही समाजसेवी संस्था नशाबंदीसाठी काम करत असतात, मात्र त्यांनाही विविध अडचणींना समोर जावं लागतं. पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांकडे आणि त्यांच्या वागणूकीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नशबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्याविलास यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram