Uddhav Thackeray : तयारीला लागा...मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंचे माजी नगरसेवकांना आदेश

Continues below advertisement

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर राज्यात सहजपणे सरकार स्थापन होईल, असे वाटले होते. मात्र, महायुतीमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर गृहमंत्रीपदावरुन झालेल्या तिढ्यामुळे अद्याप महायुती सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. एवढेच नव्हे तर शपथविधीपूर्वी अपेक्षित असलेले खातेवाटपही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आजारी असल्यामुळे पार पडू शकलेले नाही. एकनाथ शिंदे हे आजारपणाच्या कारणामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा जो तिढा झाला आहे आणि जो खेळ सुरु आहे, या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर (Matoshree) बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते.

उद्धव ठाकरे नेमके बैठकीत काय म्हणाले ?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस फक्त पत्रकं वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची रणनीती

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर आयोजित केले जाईल, अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, बाळा नर, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार  आहे. पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाईल. त्यामुळे मुंबईतील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram