Thane Crime : तोकडे कपडे घातल्याने तरुणींची छेडछाड, मलंगगड परिसरातील निंदनीय घटना ABP Majha

Continues below advertisement

डोंबिवली : केवळ तोकडे कपडे घातल्याचं कारण काढत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे तरुण इथेच थांबले नाही, तर त्यांनी  दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. ही निंदनीय घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतः ची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसाकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही, हिललाईनला जा असे सांगत माघारी धाडले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. 

डोंबिवली पलावा परिसरात राहणारे दोन तरुण आणि दोन तरुणी असे चौघेजण रविवारी सुट्टी असल्यानं सायंकाळच्या सुमारास मलंग गडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याच वेळी तरुणींनी घातलेला तोकड्या कपड्यांमुळे काही टवाळखोर 6 ते 8  तरुणांच्या जमावाने तरुणींची छेड काढण्यास सुरुवात केली. काही क्षणातच या तरुणांनी तरुणींच्या दोन्ही मित्रांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच या तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. बराच वेळ हे तरुण या मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मित्रांना काठ्यांनी मारत होते. या चौघांनी कशीबशी या तरुणांच्या तावडीतून सुटका करत तेथून  दुचाकीवरून पळ काढला. 

चौघांनी तिथून थेट नेवाली पोलीस चौकी गाठली. त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांनी मेडिकल करून या, इथे तुमची तक्रार घेणार नाही. तुम्ही हिललाईन पोलीस स्टेशनला जा असा सल्ला दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मानसिक ताण आणि शारीरिक वेदनेनं पीडित तरुणांनी अखेर सोशल मिडीयाचा आधार घेत इंस्टाग्रामवरून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर अनेकांनी त्यांची ही पोस्ट मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत न्यायाची मागणी केली. यानंतर जागं झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी हिललाईन पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 

काही अज्ञात तरुणांनी केलेल्या मारहाणीचे वळ त्यांच्या पाठीवर आणि पोटावर उठले असून बाटल्याच्या काचा लागल्याने त्यांच्या हाताला, खांद्याला आणि गळ्याला देखील जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा, हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाज कंटकावर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वत: च्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram