पावसात भिजत जवानांची अश्विनी भिडेंना मानवंदना, जवानांना भर पावसात उभं राहायची गरज होती?
एकीकडे उस्मानाबादमध्ये पाऊस पडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात मानवंदनसाठी उभ्या पोलिसांना मानवंदना टाळून भिजू नका असे सांगितले होते. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेंना मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी मुसळधार पाऊस असताना ही मानवंदना दिली. आज अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला भेट देणार होत्या. त्यासाठी अगदी सकाळी नऊ वाजतापासून अग्निशमन दलाच्या 64 जवानांची मानवंदना देणारी तुकडी तैनात करण्यात आली होती. तेव्हाही रिमझिम पाऊस सुरू होता. 64 जवान आणि अधिकारी तात्कळत त्यांची वाट पाहत होते.
अखेर त्या 11 वाजता आल्या, त्यांनी काही पाहणी केली, मात्र तोपर्यंत प्रचंड पाऊस कोसळू लागला. अशा स्थितीत देखील अग्निशमन दलाचे जवान मानवंदना देण्यास तिथे उभेच होते. भर पावसातदेखील भिडे तिथे आल्या, त्यांनी एवढ्या पावसात देखील मानवंदना कार्यक्रम घेतला. अग्निशमन दलाचे जवान नेहमीच कठीण स्थिती मध्ये कार्य करीत असतात, मात्र फक्त मानवंदना देण्यासाठी त्यांना एवढ्या पावसात उभे करणे गरजेचे होते का हा सवाल उठतो आहे.