Shivaji Park निवडणुकांच्या सभांसाठी फुल्ल! ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park) प्रचार सभांना मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बीएमसीकडे अर्ज केले आहेत. एप्रिल आणि मे सभांसाठी मैदानाची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. 17 मे रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठीही अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं अवघड असल्याची चर्चा सुरू झालीय. यातील अर्ज केलेल्या प्रत्येक पक्षाला परवानगी मिळेलच असं नाही. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी देण्यासाठी नियम, अटी आणि दिवस या सगळ्यांचा विचार करून परवानगी दिली जाते. एकाच तारखेला जर दोन पक्षांनी अर्ज केले असतील तर ज्या पक्षाने पहिल्यांदा अर्ज केला आहे त्या पक्षाला परवानगी दिली जाते.