Sachin Vaze Case | महाविकासआघाडीत खलबतं! शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यामुद्द्यवारुन विरोधकांकडून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सचिन वाझे यांच्यासह राज्यातल्या विविध मुद्द्यांवर या बेठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात तब्बल एक तास ही चर्चा झाली.
सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन विरोधकांकडून शिवसेनेला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. तर राष्ट्रवादीने मात्र या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. सुशांतसिंग प्रकरणानंतर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.