SC on Marathi Patya : मराठी पाट्यांवर 'सुप्रीम' आदेश, मनसेचं जोरदार सेलिब्रेशन
महाराष्ट्रातील दुकानं आणि आस्थापनांवर येत्या दोन महिन्यांमध्ये ठळक मराठी लिपीत पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. दसरा दिवाळीआधी आपापल्या दुकानांवर मराठी पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढवण्याची हीच वेळ असल्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दिला आहे. राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश गेल्या वर्षी जारी केले होते. त्या आदेशाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशननं न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाचा आदेश उचित ठरवताना व्यापारी संघटनेकडून करण्यात आलेली याचिका, २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून फेटाळली होती. त्या निकालाविरोधात व्यापारी संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे.