Sanjay Raut on Prasad Lad : सत्ता गेल्यामुळे बाटग्यांना झटके येतात : संजय राऊत ABP Majha
मुंबई : शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेशी पंगा घेणारा जन्माला यायचाय, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांना अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत, ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही, असं म्हणत अग्रलेखातून भाजपवर तोफ डागली आहे. तसेच शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.