Sanjay Raut Exclusive : भाजपला आणखी गळती लागणार, महाविकास आघाडीची दारं खुली : संजय राऊत

Continues below advertisement

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेसचा खडसेंकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे. त्याकडे आम्ही बघतोय. राजकारणात मागचं विसरून पुढं जायचं असतं. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणात काम केलं आहे. हा जो काही मामला आहे तो  राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे, असं राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, भाजप मोठा पक्ष आहे, खडसेंवर जो अन्याय झाला तो त्यांनी वरिष्ठांना कळवला आहे. राजकारणात गळती लागत असते. शिवसेना, राष्ट्रवादीतील अनेक नेते सोडून गेले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात, असं ते म्हणाले. ट्रेलर झालाय आता फिक्चर बाकी आहे का? असा सवाल केला असता दसरा मेळाव्यावर लक्ष ठेवा असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

संजय राऊत म्हणाले की, भाजपमध्ये बहुसंख्य लोक आहेत ते भाजपचे नाहीत. भाजपचं कॉंग्रेसीकरण होत चाललंय. एकनाथ खडसे हे आरएसएस विचारांचे आहेत त्यामुळे मला आश्चर्य वाटतं, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, भाजपमध्ये अस्वस्थता आहे.  हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. कोणीही कितीही फडफडलं, तरीही काहीही होणार नाही . अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पण हे पाप आम्हाला करायचं नाहीय, असं ते म्हणाले.

नाराजांना महाविकास आघाडीत स्थान आहे? असं विचारल्यावर  महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, असं ते म्हणाले.
 
खडसेंच्या कृषी मंत्री पदासाठी कोणतीही प्रस्ताव आलेला नाही, असंही राऊतांनी सांगितलं.  पंकजा मुंडेंना सेनेची ऑफर आहे का? यावर बोलताना ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंशी कौटुंबिक संबंध आहेत. जसा खडसेंनी निर्णय घेतलाय तसा अन्य कोणी निर्णय घेतलाय माहित नाही. कारण हे व्यक्तिगत निर्णय असतात, असं राऊत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram