Sanjay Raut at Shivaji Park : तोंडाला मास्क लावून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संजय राऊत शिवाजीपार्कात
Sanjay Raut: ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ आणि विरोधकांना एकहाती शिंगावर घेणारे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सक्तीची विश्रांती घेत आहेत. त्यांना गंभीर आजार झाल्यामुळे डॉक्टरांनी सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला प्रमाण मानून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 31 ऑक्टोबरला एक जाहीर पत्र लिहून पुढील दोन महिने मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले होते. काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घरी आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरातून बाहेर पडले नव्हते. मात्र, सोमवारी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत कोणतीही तमा न बाळगता घराबाहेर पडले आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.
संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले.