Remedesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनचा राजकीय वाद पोलीस ठाण्यात
मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु होती. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारनेही नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं. पण ही लढाई रात्री थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली.
Bruck Pharma कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीसांनी त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पार्ले पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलीस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते. पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकांना सोडून दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे. भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता? यावरून मंत्र्यांच्या ओएसडीकडून Bruck Pharma कंपनीच्या लोकांना धमकावल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.