Mumbai Local : हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्टेशनवरच थांबवण्याचा प्रस्ताव : ABP Majha

Continues below advertisement

 मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गात येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा मोठा फटका हार्बर (Harbour Railway) आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार पाचवी आणि सहावी मार्गिका टाकायची झाल्यास त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकातच संपेल. तर यापुढे मध्य रेल्वेमार्गावरील (Central Railway) फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, या दोन्ही प्रस्तांवाची व्यवहार्यता तपासली जात आहे.

लोकल ट्रेनच्या वाहतुकीत बदल का होणार?

एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन 2008 मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आता तयारी सुरु झाली आहे. 

सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होईल. यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येईल. भायखळा स्थानकातून जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे याचा वापर नव्या मार्गिकांकरिता करण्यासाठी जलद मार्गावरील फलाट तोडून त्या ठिकाणी नवी मार्गिका उभारणे शक्य आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे. यामुळे हार्बरने सीएसएमटीपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे शक्य आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram