Mumbai power outage : वीजपुरवठा बंद पाडण्यासाठी झालेल्या सायबर हल्ल्याचे तपशील, काय सांगतो अहवाल
मुंबई : मागील वर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत भारतीय सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर चीनने भारतात सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या सायबर हल्ल्याचा संबंध थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही तास झालेल्या ब्लॅकआऊटशी आहे. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यात संपूर्ण शहरातील बत्ती गुल झाली होती आणि ऐन कोरोनाच्या काळात रुग्णालयं जनरेटरवर कार्यरत होती. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.
गलवान हिंसेच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाल्याने लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या. शेअर बाजार ठप्प झाला होता. वीज गेल्याने दोन कोटी मुंबईकर अंधारात होते. रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जनरेटर सुरु करावा लागले होते, जेणेकरुन व्हेंटिलेटर सुरु राहतील. हा तोच काळ होता, जेव्हा भारतात कोरोना शिखरावर होता.
मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत ब्लॅकआऊट झालं होतं. आतापर्यंतच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, या सर्व घटना एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. त्यावेळी मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनमधूल झालेला सायबर हल्ला असू शकतो असा दावा भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने काही वृत्तात म्हटलं होतं.