Mumbai : 'POP' बंदीबाबत आज निर्णय, आयुक्तांची आज मुर्तिकार संघटनांसोबत महत्वाची बैठक
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर आणलेली बंदी, न्यायालयांचे पर्यावरणपूरक उत्सवांसाठीचे निर्णय या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गणेशोत्सव समित्या, मूर्तिकार संघटना यांची बैठक आज, सोमवारी बोलावली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर आणलेली बंदी, न्यायालयांचे पर्यावरणपूरक उत्सवांसाठीचे निर्णय या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गणेशोत्सव समित्या, मूर्तिकार संघटना यांची बैठक आज, सोमवारी बोलावली आहे. मुंबईच्या महापौरांसह अनेक लोकप्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. माघी गणेशोत्सव जवळ येत असताना होत असलेल्या या बैठकीमध्ये पीओपी वापराबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याआधीच पीओपीबंदीचा निर्णय दिला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पर्यावरणपूरक उत्सवासाठीची नियमावलीच मे २०२० मध्ये जाहीर केली होती. पीओपी बंदीसह पर्यावरणपूरक उत्सवासाठीची नियमावली १ जानेवारी २०२१ पासून लागू करण्याच्या सूचना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका यांना याआधीच देण्यात आल्या आहेत. मूर्तीची उंची मर्यादित ठेवणे, कृत्रिम तलावांमध्येच मूर्तींचे विसर्जन करणे, पर्यावरणाला हानी पोहोचेल असे साहित्य सजावटीत न वापरणे अशा अनेक महत्वाच्या मुद्यांचा समावेश या नियमावलीत आहे. स्थानिक प्रशासने व विविध घटकांकडून आतापर्यंत या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. पण त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी बैठक होत आहे.
पीओपी वापरावर बंदी आणण्याबाबत सन २००८ पासून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही पर्यावरणपूरक उत्सवासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना याआधीही अनेकदा केल्या आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य स्तरावर आतापर्यंत केवळ वेळ मारुन नेण्याचे धोरण अवलंबण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संघटनांकडून सातत्याने होत आला आहे. पीओपीला काही पर्याय असू शकतो का, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी या प्रश्नातून कसा तोडगा काढता येऊ शकतो याबाबत गणेशोत्सव समितीने प्रशासनासोबत याआधीही अनेकदा खल केला आहे. पण त्यातून सर्वमान्य तोडगा निघू शकलेला नाही. पीओपीच्या वापराबाबत मूर्तिकारांमध्येही दोन गट आहेत. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत त्यांच्यात कुठल्या मुद्यावर एकमत होते याकडे मंडळांचे लक्ष लागले आहे.