Sachin Vaze | अंबानींच्या घराबाहेर घटनेचं नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावलं
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी सध्या एनआयए ही तपास यंत्रणा संशयित आरोपी सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर सचिन वाझे यांना आणून घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानंतर सीसीटिव्हीमध्ये जे फुटेज मिळाले त्याप्रमाणे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे रुपांतर चालू होते.
कसे होते नाट्यरुपांतर?
स्फोटकं ठेवल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून पीपीई किट सदृष्य झब्बा घालून एक व्यक्ती मागील बाजून उतरुन निघून गेला होता. हे सर्व दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं आहे. ही व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या व्यक्तीची चाल ही सचिन वाझे यांच्या सारखी आहे का? हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांनी घटनास्थळी आणून फुटेजमधील व्यक्तीप्रमाणे चालण्यास सांगण्यात आले होते.
यासाठी अगोदर सर्व ठिकाणी मार्किंग केलं होतं. घटना रात्रीच्या असल्याने हे नाट्यरुपांतरासाठी रात्रीची वेळ निवडल्याचे सांगितले जाते. सचिन वाझे यांची नैसर्गिक चाल ओळखण्यासाठी त्यांना अनेकदा चालण्यास सांगितलं जात होतं. हे सर्व कैद करण्यासाठी कॅमेराही सीसीटिव्ही रिझोल्युशनचा वापरल्याची माहिती मिळत आहे. यासाठी कॅमेरा शिडीच्या माध्यमातून सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या उंचीवर लावला होता.
सचिन वाझे यांना सुरुवातीला पँट-शर्टमध्ये विशिष्ठ ठिकाणावरुन चालण्यास सांगण्यात आले. यानंतर त्यांना कुर्ता घालूनही दोनतीन वेळा चालायला लावले. यावेळी त्यांच्या डोक्याला रुमाल बांधलेला पहायला मिळाला. हे सर्व नाट्यरुपांतर संग्रहित करण्यासाठी पुण्यावरुन खास फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने हे सर्व पुरावे आपल्या सोबत तपासासाठी घेतले आहेत. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते.