Mumbai : मिठी नदीत नियमांचं उल्लंघन, नदीपात्रात बांधला रस्ता
मुंबईतल्या मिठी नदीत नियमांचं उल्लंघन करुन भर पात्रात रस्ता बांधण्यात आला आहे. हा भराव पावसाळ्याआधी काढण्यात आला नाही तर, ऐन पावसाळ्यात मिठी नदीला पूर येऊन मुंबई तुंबण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव नदीचे नैसर्गिक प्रवाह रोखू नका अथवा वळवू नका अशा स्पष्ट सूचना राष्ट्रीय हरित लवादानं दिल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारानं मिठी नदीच्या पात्राचं रुंदीकरण करून नियमांचं उल्लंघन केलं. त्यानं नदीपात्रातच रस्ता बांधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी-कुर्ला रोडला लागून असलेल्या मरोळ परिसरात हा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळं नदीपात्रामधली जैवविविधता धोक्यात आली आहे. पण यंदाच्या पावसाळ्याआधी मुंबई महापालिकेकडून नदीची साफसफाई होणं आणि हा भराव काढून टाकणं गरजेचं आहे. अन्यथा मोठ्या पावसात नदीला पूर येऊन मुंबईला त्याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.